प्रत्येक राजकीय पक्षाने उमेदवारांची परीक्षा घ्यावी राज ठाकरे यांची अपेक्षा
व्हिडिओकॉन प्रस्तुत लोकमतच्या तिसाव्या वर्धापनदिनानिमित्त औरंगाबादेत सोमवारी आयोजित कविसंमेलनात बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. समोर श्रोत्यांनी खचाखच भरलेला लोकमत लॉन.
औरंगाबाद। दि. २ (लोकमत ब्युरो)
आपण जिथे जायला निघालो आहोत, तिथले सामान्यज्ञान आवश्यक आहे. म्हणून मी मनसेतर्फे मुंबई मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतली. अर्थात, ही काही आयएएस, आयपीएस पद्धतीची परीक्षा नव्हती. सामान्यज्ञान तपासून घेणारी परीक्षा सर्वच पक्षांनी घ्यावी, अशी अपेक्षा आज लोकमत औरंगाबाद महोत्सवात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
व्हिडिओकॉन प्रस्तुत लोकमतच्या ३0 व्या वर्धापनदिनानिमित्त आजपासून या महोत्सवास प्रारंभ झाला. या महोत्सवाची सुरुवात कविसंमेलनाने झाली. राज ठाकरे यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून या कविसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून ठाकरे यांनी अभिवादन केले. आकाशात सोडलेले फुगे व्यासपीठाच्या पाठीमागे असलेल्या अशोकाच्या झाडाला लटकले. त्यावर ‘अशोका म्हणजे काँग्रेस. नुसतेच वाढत जाते. फूलही येत नाही आणि सावलीही देत नाही‘ अशी उत्स्फूर्त टिपणी करताच उपस्थितांना हसू आवरता आले नाही.
कवींनी मोजकेच प्रश्न विचारले..
या कविसंमेलनातील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे आणि किशोर कदम यांनी राज ठाकरे यांना मोजकेच प्रश्न विचारले व त्याला राजशैलीत ठाकरे यांनी उत्तरे दिली. त्यातला पहिला प्रश्न उमेदवारांच्या परीक्षेचा किशोर कदम यांनी विचारला होता. मुंबईचे शिल्पकार कोण, या प्रश्नाच्या उत्तरात एकाने सचिन तेंडुलकर असे लिहिले होते, असे राज ठाकरे यांनी सांगताच पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हास्याची खसखस पिकली. एकट्या मुंबई मनपाचा अर्थसंकल्प २१ हजार कोटींचा आहे. केरळसारख्या राज्याएवढय़ा अर्थसंकल्पाच्या शहराचे नेमके प्रश्न काय, ते सोडवावे कसे हे कळले पाहिजे, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. असा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण साहित्य व सिनेशौकीन आहात. कधीतरी आपण कार्टून फिल्म काढणार काय, या किशोर कदम यांच्या प्रश्नाच्या उत्तरात राज उत्तरले, अँनिमेशन फिल्म काढणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे. ते करिअर मानूनच करावे लागेल. मग त्यासाठी मला राजकारण सोडावे लागेल. काटरून फिल्म काढणे आणि राजकारण करणे हे एकसाथ शक्य नाही; पण पुढे मागे मी फिल्म मात्र बनवू शकेन. ते मला आवडेल. मग मला त्यात भूमिका करायला आवडेल, असा हजरजबाबीपणा किशोर कदम यांनी दाखविला.
एकहाती सत्ता द्या..
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपला पक्ष जाहीरनामा प्रकाशित करणार का? असा प्रश्न कवी अशोक नायगावकर यांनी विचारला. राज ठाकरे म्हणाले, अर्थातच; पण मला एकहाती सत्ता द्याल तर शंभर टक्के प्रश्न सुटू शकतात. गुजरातमध्ये एकहाती सत्ता आहे, तिथे विकास झाला.
बिहारमध्ये नितीशकुमारांच्या एकहाती सत्ता दिली, तर तिथे विकास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही हे घडू शकते. जनतेने ठरविले तर नव्हत्याचे होते व होत्याचे नव्हते होऊ शकते. (टाळ्या)
ज्येष्ठ वातट्रिकाकार रामदास फुटाणे यांनी ‘महाराष्ट्रात पुढे- मागे पुणे पॅटर्न राबविण्यात येण्याची शक्यता आहे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी सांगितले की, पुणे पॅटर्न फेल आहे; पण हे करण्याची गरज काय? नालायक निघाला तर त्याला बाजूला करा, दुसर्याला संधी द्या. पुणे पॅटर्न म्हणजे काही डिझाईन पॅटर्न नाही.
मी फटकळ आहे, उद्धट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले व एक टोला अजित पवार यांना लगावला. कोकणात काय करायचे ते निवडणुकीच्या वेळी पाहूृ. तूर्त नारायण राणे यांना बोलू नका, असा सल्ला दिला आहे, असे राज म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांनी केले. त्यात त्यांनी लोकमतच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देऊन लोकमत हे वाचकांचे दैनिक असल्याचे सांगितले. यावेळी राज ठाकरे यांचे स्वागत ऋषी दर्डा यांनी केले.
अशोक नायगावकर यांचे स्वागत समूह संपादक दिनकर रायकर यांनी, रामदास फुटाणे यांचे स्वागत निवासी संपादक चक्रधर दळवी यांनी, गुरू ठाकूर यांचे स्वागत लोकमत समाचारचे संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी, किशोर कदम यांचे स्वागत लोकमतचे वृत्तसंपादक श्रीकांत भराडे यांनी, निवेदक अरुण म्हात्रे यांचे स्वागत लोकमत टाइम्सचे वृत्तसंपादक के. एम. जोसेफ यांनी केले. यावेळी मनसेचे आ. बाळा नांदगावकर यांचे स्वागत ब्युरो चीफ नजीर शेख यांनी, तर अतुल सरपोतदार यांचे स्वागत चक्रधर दळवी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई लोकमतचे ब्युरो चीफ अतुल कुलकर्णी यांनी केले. कविसंमेलनासाठी रसिक- श्रोत्यांची अफाट गर्दी झाली होती.
जवाहरलाल दर्डा यांची आठवण..
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची आठवण काढली. मार्मिकचे काम करीत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे एक जबाबदारी सोपविली होती. मार्मिकचा अंक आणि मिठाईचा बॉक्स घेऊन काही मान्यवरांना मला भेटायला सांगितले होते. त्यावेळी मी जवाहरलाल दर्डा यांच्या घरी मुंबईत भेटलो होतो. अत्यंत आस्थेवाईकपणे माझी त्यांनी चौकशी केली होती. ती माझी पहिली आणि शेवटची भेट होती. नंतर विजयबाबू आणि राजेंद्र दर्डा यांचा स्नेह वाढला. आता ऋषी दर्डा आणि करण दर्डा यांच्याशी मैत्री आहे आणि लोकमतचा कार्यक्रम म्हटल्यानंतर सहसा मी टाळत नाही. म्हणून आज मी मुद्दाम आलो.


ताज्या प्रतिक्रिया