माझ्या बेरकी मांजरा.
रुणुझुणुत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा या “टिळा लाविते मी रक्ताचा” या चित्रपटातील गीताच्या चालीवर.
पहिला कोरस [चाल - घागर घुमू दे घुमू दे]
सासू येणार, येणार । आला ग बाई सांगावा
आता घरात, दारात । होईल रोज कांगावा
माझ्या बेरकी मांजरा । तुला लोण्याचा कटोरा
आली सासू माझी दारी । तिला “प्रसाद” दे जरा
माझ्या बेरकी मांजरा……………………………..॥ध्रु॥
सासू माझी द्वाड भारी । गोड कडूलिंबापरी
मुक्ताफळांच्या घोटांनी जीव होतो ग घाबरा
माझ्या बेरकी मांजरा……………………………..॥१॥
दुसरा कोरस [चाल - सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे]
अश्शी फणकारते बनेल माझी सासू ग
कद्धी यायचं नाही थोबाडावर हासू ग
माझ्या बेरकी मांजरा……………………………..
तोफ मुलुखमैदान । उडविते दाणादाण
जसा खौट खोबर्याचा तोंडी भरला तोबरा
माझ्या बेरकी मांजरा……………………………..॥२॥
तिसरा कोरस [चाल - सौभाग्याचं लेणं गवर माझी लेवू दे]
चांगलं काही बघता पोटात हिच्या दुखतं ग
माझं सौख्य डोळ्यांत कुसळावानी खुपतं ग
माझ्या बेरकी मांजरा……………………………..
जसा उंबरा ओलांडे । तशी कचाकचा भांडे
केले अंगारे-धुपारे । रोग नाही झाला बरा
माझ्या बेरकी मांजरा……………………………..॥३॥
-क्रांति


ताज्या प्रतिक्रिया